दापोली तालुक्यातील हर्णेच्या सुवर्णदुर्गचा संरक्षक गोवा किल्ल्याचा बुरूज ढासळला


दापोली तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक महत्त्वाच्या गोवा किल्ल्याचा उत्तरेकडील बुरुज कोसळल्याने राज्य संरक्षित स्मारकांच्या संवर्धन कामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. तब्बल ६ कोटी ७१ लाख रुपयांहून अधिक खर्चाच्या जतन-दुरुस्तीचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असताना तटबंदीचा भाग ढासळल्याने इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हर्णे हे दापोली तालुक्यातील असे एकमेव गाव आहे, जिथे सुवर्णदुर्ग (जलदुर्ग), कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवा किल्ला (भुईकोट) असे चार ऐतिहासिक किल्ले आहेत. त्यापैकी गोवा किल्ला हा सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या तीन सहाय्यक किल्ल्यांपैकी एक असून इतिहास आणि पर्यटनाच्या दृष्टीने त्याला विशेष महत्त्व आहे. किल्ल्याला जमिनीच्या दिशेने एक आणि समुद्राच्या दिशेने एक असे दोन प्रवेशद्वार आहेत. समुद्राकडील मुख्य प्रवेशद्वाराजवळ हनुमानाची मूर्ती असून वर्षभर पर्यटक येथे भेट देतात. विशेषतः पर्यटन हंगामात संध्याकाळच्यावेळी या किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी होत असते. संचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई यांच्या अखत्यारीतील हा राज्य संरक्षित किल्ला काही वर्षांपूर्वी मोठ्याप्रमाणात ढासळत असल्याने त्याच्या जतनासाठी शासनाने पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button