
शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयांत अजित पवारांची जयंती साजरी होणार; राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या यादीत समावेश!
महाराष्ट्र सरकारने राज्याचे नेते स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने आज (१५ जुलै) रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. अजित पवारांच्या जयंतीच्या निमित्ताने २२ जुलै रोजी राज्यभर होणार भरगच्च कार्यक्रम आयोजन केले जाणार आहे. यामुळे अजित पवारांच्या राज्याच्या विकासातील योगदानाचा शासनाकडून गौरव करण्यात आला आहे.
अजित पवारांची जयंती राज्यभर साजरी होणार
परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै, २०२६ रोजी अजित पवार यांची जयंती राज्यभर साजरी केली जाईल. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अजित पवारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. हा आदेश केवळ मंत्रालयापुरता मर्यादित नसून, राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह सर्व शाळा व महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला आहे.
अजित पवारांना आदरांजली
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या भागातील सर्व यंत्रणांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाने या निर्णयाच्या माध्यमातून अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाला आणि त्यांच्या अविरत कार्यपद्धतीला दिलेली ही एक मोठी आदरांजली मानली जात आहे.
राज्य शासनाने स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत केला आहे. यासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज जारी केले आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्वागत
अजित पवारांची जयंती राज्यभर साजरी करण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्मयाचे राष्ट्रवादीकडून (अजित पवार) स्वागत करण्यात आले आहे. पक्षाचे सरचिटणीस सूरज चव्हाण, विधानपरिषदेचे माजी आमदार अमोल मिटकरी, सुनीर टिंगरे यासह पक्षा्या आमदारांनी आणि विविध नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता.




