
सावर्डेतील नागरी समस्यांवर तोडगा; शौकतभाई माखजनकर यांच्या पाठपुराव्याला यश
सावर्डे (विनायक सावंत) : चिपळूण तालुक्यातील केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या सावर्डे येथील विविध नागरी समस्यांबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. पंचायत समिती सदस्य शौकतभाई माखजनकर यांनी व्यापारी संघटना सावर्डे यांच्या सहकार्याने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे परिसरातील धोकादायक खड्डा वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होता. या खड्ड्यामुळे वारंवार अपघात होत असून मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती. याशिवाय डेरवण येथील जागतिक दर्जाच्या रुग्णालयाला महामार्गाशी जोडणाऱ्या मार्गावरील खराब पॅच, आवश्यक ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी, महामार्गालगत वाढलेले गवत तसेच सावर्डे एसटी पिकअप शेड व बसथांब्याशी संबंधित विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.
या सर्व प्रश्नांवर नुकत्याच झालेल्या बैठकीत संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, पॅचवर्क, आवश्यक ठिकाणी गतिरोधक उभारणी तसेच वाढलेल्या गवताची साफसफाई आदी कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.
या कामांमुळे वाहनचालकांसह डेरवण रुग्णालयात ये-जा करणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंचायत समिती सदस्य शौकतभाई माखजनकर यांनी कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत कामांची गुणवत्ता आणि गती यावर लक्ष ठेवले.
व्यापारी संघटना सावर्डे यांनीही स्थानिक नागरिकांच्या अडचणी सातत्याने प्रशासनापर्यंत पोहोचवून या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध समस्या मार्गी लावतानाच पंचक्रोशीतील दिव्यांग, बालक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न सोडवून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य शौकतभाई माखजनकर तसेच व्यापारी संघटना सावर्डे यांच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले आहे. भविष्यातही सावर्डे परिसरातील उर्वरित नागरी समस्यांवर अशाच प्रकारे तत्परतेने कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.




