कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी; सीएसएमटी ते सावंतवाडी रोड नियमित एक्स्प्रेसला आजपासून सुरुवात!


खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश


मुंबई : कोकणवासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वेगाडीला आजपासून सुरुवात झाली आहे. या गाडीमुळे मुंबई आणि कोकणातील प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची महत्त्वाची मागणी पूर्ण झाली असून, कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात या नवीन रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून कोकणवासियांच्या सेवेत दाखल करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवेला प्रारंभ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि महापौर रितू तावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्स्प्रेस सुरू व्हावी, अशी कोकणवासियांची दीर्घकाळापासून मागणी होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने कोकणातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

या नवीन नियमित रेल्वेसेवेमुळे मुंबई, ठाणे परिसरातून कोकणात ये-जा करणारे प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार तसेच पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून, कोकणातील रेल्वे प्रवासाला आणखी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button