ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा राजीनामा; युवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी


कोणतीही नाराजी नाही; वयोमानामुळे स्वतःहून पद सोडण्याचा निर्णय


रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील युवासेनेच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेली घटना समोर आली आहे. रत्नागिरी जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, वयोमानानुसार युवासेनेचे नेतृत्व खऱ्या अर्थाने युवा कार्यकर्त्याकडे सोपवावे, अशी मागणी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, सावंत यांनी आपल्या राजीनाम्यामागे कोणतीही नाराजी अथवा मतभेदाचे कारण दिलेले नाही. उलट, तरुण आणि तडफदार कार्यकर्त्याला पुढे येण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आपण स्वतःहून पद सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी, राजापूर-लांजा आणि चिपळूण-संगमेश्वर या तीन विधानसभा मतदारसंघांसाठी प्रसाद सावंत यांची जिल्हा युवा अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यापूर्वीही त्यांनी युवासेना आणि शिवसेना संघटनेत विविध पदांवर काम करताना संघटनात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत.

संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न

गेले कित्येक महिने रिक्त असलेली जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सावंत यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये दौरे करून युवासेनेच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतला होता. विविध भागांतील युवासैनिकांशी संवाद साधून संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

पद सोडले तरी पक्षासाठी काम सुरूच

युवासेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला असला तरी शिवसेना संघटनेच्या वाढीसाठी आपले काम सुरूच राहणार असल्याचे प्रसाद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षासाठी काम करत राहणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय झालेल्या प्रसाद सावंत यांनी कॉलेज उपाध्यक्ष, शिवसेना उपविभाग प्रमुख, दोन वेळा युवासेना तालुकाप्रमुख, शिवसेना शहर संघटक आणि युवासेना जिल्हाप्रमुख अशी विविध पदे सांभाळली आहेत. अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून, युवासेनेच्या जडणघडणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

युवकांमध्ये लोकप्रिय, बेधडक आणि निडर नेतृत्व म्हणून प्रसाद सावंत यांची ओळख आहे. युवकांचा मोठा पाठिंबा असलेला चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात अलीकडच्या काळात युवासेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन शिंदे गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसाद सावंत यांचा राजीनामा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, त्यांनी कोणत्याही नाराजीचा उल्लेख न करता वयाचा विचार करून युवा नेतृत्वाला संधी मिळावी, या स्पष्ट भूमिकेतून पदाचा राजीनामा दिल्याने पक्षातील अनेकांनी त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button