हर्चे शाखा डाकघरातील ८.२० लाखांच्या अपहारप्रकरणी शाखा डाकपालाविरोधात गुन्हा


ग्राहकांकडून स्वीकारलेल्या रकमेची नोंद न करता अपहार केल्याचा आरोप; लांजा पोलिसांकडून तपास सुरू
लांजा : तालुक्यातील हर्चे शाखा डाकघरात ८ लाख २० हजार १५२ रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी शाखा डाकपाल जयप्रकाश यशवंत पवार (वय ५१, रा. हर्चे, बौद्धवाडी) यांच्याविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २९ जुलै २०१३ ते २७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
याप्रकरणी समीर सूर्यकांत बेल्हेकर (वय ३६), डाकघर निरीक्षक, लांजा उपविभाग, रा. वैभव वसाहत, लांजा यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, जयप्रकाश पवार हे हर्चे शाखा डाकघरात शाखा डाकपाल म्हणून कार्यरत असताना पोस्टाच्या विविध योजनांची खाती उघडण्यासाठी ग्राहकांकडून स्वीकारलेली रक्कम शासकीय अभिलेखांमध्ये नोंदवली नसल्याचा आरोप आहे. तसेच ही रक्कम शासनाच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या कथित आर्थिक गैरव्यवहारात ५ लाख ३० हजार १५२ रुपये कायमस्वरूपी अपहार झाल्याचे, तर २ लाख ९० हजार रुपये तात्पुरते वळते करण्यात आल्याचे समोर आले असून, एकूण ८ लाख २० हजार १५२ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी १३ जुलै २०२६ रोजी रात्री लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button