जुन्या पेन्शन साठी शालेय कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन


महाराष्ट्र राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व नंतर 100% अनुदान प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे.
राज्यात गेल्या बारा वर्षांपासून खाजगी अनुदानित शाळांचा शिक्षकांचा जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.काही शिक्षकांची भविष्य निर्वाह खाती चालू आहेत. तर काही शिक्षकांची भविष्य निर्वाह खाती बंद करण्यात आली आहेत.प्रत्येक विभागातील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता तीन खंड पिठानी जुनी पेन्शन देण्याचा निर्णय दिला आहे. तरीही शासन पातळीवर अजूनही ठोस निर्णय घेतला जात नाही. सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात गेले 7 वर्षे केस चालू असून तिथे सकारात्मक प्रतिज्ञापत्र देण्याचे शासनाने मान्य करूनही अजूनही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.या विरोधात निषेध नोंदविण्यासाठी संपूर्ण राज्यात दिनांक 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर 2026 पर्यंत काळी फित लावून कामकाज केले जाणार आहे. तसेच 5 सप्टेंबर शिक्षकदिन असल्याने या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा तोंडाला काळा मास्क लावून मुक मोर्चा काढून मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदय यांना जुनी पेन्शन संदर्भात मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. तसेच आंदोलनादरम्यान सेवानिवृत्त शिक्षक इच्छा मरणाची मागणी करणार आहेत.तसेच राज्यातील आमदार, खासदार, मंत्री महोदय यांना जुनी पेन्शन संदर्भात मागण्यांचे निवेदन देणार आहेत.
शासनाने 25 सप्टेंबर पर्यंत जुनी पेन्शन संदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास 28 सप्टेंबर 2026 पासून आझाद मैदान मुंबई येथे राज्यस्तरीय आमरण उपोषण करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.या आंदोलनाला राज्यातील मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना यांनी विना अट पाठींबा जाहीर केला असून प्रत्येक आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर केले आहे.या निर्णायक आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पेन्शन पिडीत बंधू भगिनी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघ समन्वयक श्री संदेश राऊत, रत्नागिरी जिल्हा जुनी पेन्शन संघटना जिल्ह्याध्यक्ष श्री तुफील पटेल , रत्नागिरी जिल्हा जुनी पेन्शन संघटना जिल्हा सचिव श्री संदेश रहाटे, रत्नागिरी जिल्हा सहसचिव श्री महेंद्र पवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button