
पोलादपूर अपघातातील आणखी एक बळी; कृषी विद्यापीठाचे सहाय्यक नियंत्रक अनिल मरकड यांचे निधन
दापोली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर येथे झालेल्या भीषण अपघातात पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील सहाय्यक नियंत्रक अनिल मरकड यांचीही मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचे निधन झाले. त्यामुळे या दुर्दैवी अपघातातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.
३० मे रोजी मरकड कुटुंबीय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथून दापोलीकडे परतत असताना पोलादपूर येथे त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत अनिल मरकड यांच्या पत्नी सुवर्णा मरकड आणि मुलगी अनुश्री यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अनिल मरकड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
या भीषण अपघातातून त्यांचा आठ वर्षांचा मुलगा चिन्मय सुदैवाने बचावला. मात्र अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत त्याच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अनिल मरकड हे २००७ मध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सेवेत रुजू झाले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. मेहनती, कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. पदाची उंची असूनही सर्वांशी आपुलकीने वागणारे आणि हसतमुख स्वभावामुळे ते सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते.
पत्नी सुवर्णा मरकड यांच्या बाराव्या विधीच्या पूर्वसंध्येलाच अनिल मरकड यांचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा आणखी मोठा आघात झाला आहे. त्यांचे वडील रावसाहेब मरकड हे पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील रुद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. सून, नात आणि आता मुलगा अशा सलग तीन दुःखद घटनांनी मरकड कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.
अनिल मरकड यांच्यावर बुधवारी त्यांच्या मूळ गावी तिसगाव (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, आठ वर्षांचा मुलगा चिन्मय, भाऊ, बहीण आणि अन्य आप्तेष्ट असा परिवार आहे.
अनिल मरकड यांच्या निधनाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासह शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून, संपूर्ण विद्यापीठ परिवारावर शोककळा पसरली आहे.




