
कोंढे येथे डीपीच्या स्पार्किंगमुळे आग; ग्रामस्थांची सतर्कता आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला.
चिपळूण : तालुक्यातील कोंढे गावात सोमवारी दुपारी विद्युत वितरण ट्रान्सफॉर्मर (डीपी) मधून झालेल्या स्पार्किंगमुळे सुक्या गवताला आग लागल्याची घटना घडली. आग वेगाने पसरत असतानाच ग्रामस्थांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढे शाळा स्टॉपसमोरील स्वर्गीय सुनील मिरगल यांच्या मालकीची जागा अनेक वर्षांपासून ओसाड असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडीझुडपे वाढलेली आहेत. याच परिसरात महावितरणचा विद्युत डीपी उभारण्यात आला आहे. सोमवारी दुपारी डीपीमधून अचानक स्पार्किंग सुरू झाल्याने उडालेल्या ठिणग्या सुक्या गवतावर पडल्या आणि काही क्षणांतच आगीने पेट घेतला.
आग झपाट्याने वाढत असल्याचे दिसताच ग्रामस्थांनी तातडीने चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आग वेळेत विझवण्यात यश आले नसते तर जवळील घरे तसेच कोंढे बौद्धवाडी परिसराला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे संभाव्य जीवित आणि वित्तहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान, संबंधित डीपीमधून वारंवार स्पार्किंग होत असल्याबाबत महावितरणकडे यापूर्वी अनेकदा तक्रारी करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. घटनेनंतर संबंधित डीपीची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाने अत्यंत जलदगतीने परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.




