
विनाटाका शस्त्रक्रिया करून मेंदूतील गुंतागुंतीची गाठ यशस्वीरित्या काढली; वैद्यकीय क्षेत्रातील गरुडझेप
चिपळूण येथील बीकेएल वालावलकर रुग्णालयात एका रुग्णाच्या डोळ्यांच्या मज्जातंतूंवर (ऑप्टिक नर्व्हज) धोकादायकपणे दाब देणाऱ्या पिट्युटरी ट्यूमरला (गाठीला) काढण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची ‘एन्डोस्कोपिक ट्रान्सनासल’ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
ही प्रगत आणि विनाटाका शस्त्रक्रिया पूर्णपणे रुग्णाच्या नाकावाटे करण्यात आली, ज्यामुळे बाहेरून कोणतीही चीरफाड किंवा कवटी उघडण्याची गरज भासली नाही. या शस्त्रक्रियेचे नेतृत्व न्यूरोसर्जन डॉ. मृदुल भटजीवाले आणि ईएनटी (ENT) सर्जन डॉ. राजीव केणी यांच्या बहुविद्याशाखीय सर्जिकल टीमने केले.
“संपूर्ण शस्त्रक्रिया नाकावाटे केल्यामुळे आम्हाला कवटीच्या तळाचे थेट, प्रकाशमान आणि मोठे (मॅग्निफाईड) दृश्य मिळते. बाहेरून ही पूर्णपणे विनाटाका शस्त्रक्रिया असते. गाठीपर्यंत पोहोचण्यासाठी मेंदूला बाजूला करावे लागत नसल्याने, रुग्णाला खूप कमी त्रास होतो, शरीरावर कोणतेही वण राहत नाहीत आणि रुग्ण खूप लवकर आपल्या दैनंदिन जीवनाकडे परतू शकतो.”
अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी उत्तम शरीरशास्त्रीय व्यवस्थापन आवश्यक असते. या प्रक्रियेत भूलतज्ज्ञ (अनेस्थेसिया टीम) डॉ. निवर्गि आणि डॉ. निवेदिता यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कवटीच्या तळाशी अत्यंत नाजूकपणे काम सुरू असताना रुग्णाची स्थिती स्थिर राहील याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली.
महानगरांमधील मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये अशा उच्च दर्जाच्या न्यूरोसर्जिकल प्रक्रियांसाठी साधारणपणे लाखो रुपये खर्च येतो. मात्र, ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’अंतर्गत (PMJAY) या रुग्णावर ही संपूर्ण शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. अशी माहिती रुग्णालयाच्या संचालिका सौ. सुवर्णा पाटील यांनी दिली.
दरम्यान, ही गाठ इतकी मोठी झाली होती की, तिचा डोळ्यांच्या मज्जातंतूवर थेट दाब पडत होता. ज्यामुळे रुग्णाला कायमचे अंधत्व येण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.
“ही गाठ कवटीच्या तळाशी अत्यंत नाजूक ठिकाणी होती. ज्यामुळे दृष्टीच्या मज्जातंतूंवर मोठा दाब येत होता,” असे न्यूरोसर्जन डॉ. मृदुल भटजीवाले यांनी स्पष्ट केले. “ईएनटी टीमच्या सहकार्याने, आम्ही एन्डोस्कोपचा वापर करून थेट गाठीपर्यंत पोहोचू शकलो. या ‘मिनिमली इन्व्हेजिव्ह’ (कमीत कमी चीरफाड असलेल्या) पद्धतीमुळे आम्हाला डोळ्यांच्या मज्जातंतूंचा दाब सुरक्षितपणे कमी करता आला आणि अत्यंत अचूकतेने गाठ काढता आली. यामुळे रुग्णाची दृष्टी तर वाचलीच, शिवाय त्यांना पारंपरिक ‘ओपन-ब्रेन’ शस्त्रक्रियेनंतर लागणाऱ्या दीर्घकालीन आरामाची गरज भासली नाही.” असे ही डॉ. भटजीवाले यांनी सांगितले.
ट्रान्सनासल एन्डोस्कोपिक’ पद्धत या भागात उपलब्ध असलेल्या न्यूरोसर्जिकल सुविधांमधील एक मोठी झेप आहे. यामध्ये मेंदूतील खोलवर असलेल्या गाठींपर्यंत पोहोचण्यासाठी नाकाचा नैसर्गिक मार्ग वापरला जातो.
ईएनटी सर्जन डॉ. राजीव केणी यांनी या पद्धतीच्या तांत्रिक फायद्यांवर प्रकाश टाकला.




