
‘महाराष्ट्रावर अल निनोचं मोठं संकट, पावसाच्या दोन दिवसांत मोठं अंतर’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती!
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी काळात कृषी क्षेत्रावर असणाऱ्या संभाव्य संकटाबाबत माहिती दिली.
तसेच या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असणाऱ्या उपाययोजनांची देखील सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांना खरीप हंगामात शेतासाठी पैशांची कमतरता भासू नये यासाठी बँकांना महत्त्वाचे निर्देश दिल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच शेतकरी कर्जमाफी ही 30 जूनपर्यंत करु, अशी देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अल निनोच्या संभाव्य धोक्यावरही चिंता व्यक्त केली. तसेच या काळात काय-काय उपाययोजना केल्या जातील, याबाबत सविस्तर माहिती दिली.
“आज राज्याच्या येत्या कृषीच्या खरीप हंगामाची हंगामपूर्वी तयारीची बैठक घेतली. त्यापूर्वी राज्यस्तरीय बँकिंग किमिटी एसएलबीसीची बैठक झाली. या बैठकीत एकूण कर्जवाटपाबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज कसं मिळू शकेल या संदर्भात सगळी तसबीज करण्यात आली”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
“असं लक्षात आलं की, आपल्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत, आणि ग्रामीण बँक, या मिळून 67 टक्के शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं. राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना केवळ 26 टक्के कर्ज देतात. डीसीसी आणि ग्रामीण बँकेचा जो टार्गेटचा अॅचिव्हमेंट आहे ते 80 टक्क्यांच्यावर आहे. पण राष्ट्रीयकृत बँकांचं 67 टक्के आहे. त्यामुळे आज अतिशय कडक शब्दांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांना हे सांगण्यात आलं आहे की, त्यांनी 80 टक्क्याच्यावर टार्गेट पू्र्ण केलं पाहिजे. दुसरं त्यांना सांगण्यात आलं आहे की, सीबीलची मागणी कोणत्याही बँकेने करु नये. या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं आहे की, मुख्यालयमधून प्रत्येक शाखेला पत्र पाठवून सांगितलं पाहिजे की, पीक कर्जासाठी सीबीलची अट नाही. आरबीआयचेदेखील अधिकारी होते. त्यांनीदेखील त्याला पुष्टी दिली आहे. याबाबत आपण आदेश काढले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
“सर्व बँकांशी कर्जमाफीबाबत चर्चा केली आहे. जी काही कर्जमाफी करायची आहे, त्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो निर्णय घेतला आहे तो वेळेत पूर्ण करु अशा पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रावर अल निनोचं संकट, मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त, उपाययोजनांची दिली माहिती
“महाराष्ट्रात सर्वात मोठा हंगाम हा खरिपाचा असतो. त्यानंतर रब्बी आणि उन्हाळी पिकं शेतकरी घेतात. खरिपाचं क्षेत्र १५२ लाख आहे. यामध्ये सर्वात मोठं क्षेत्र सोयाबीन आणि कापूस यांचं जवळपास ८८ लाख हेक्टर असतं. ऊसही आपण मोठ्या प्रमाणात घेतो. आता खरीप हंगामात मोठं संकट हे अल निनोचं आहे. आज हवामान विभागाने केलेल्या मांडणीनुसार, पावसाचं लाँग टर्म ॲव्हरेज ८८ टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे. असं असलं तरी ते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे असेल. विशेषत: पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीत हवामानाच्या अंदाजानुसार प्लॅनिंग कसा करता येईल हा प्रयत्न केला आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता आहे. जूनमध्ये पाऊस येईल. त्यापेक्षा कमी जुलैमध्ये येईल. त्यापेक्षा कमी ऑगस्ट आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असा प्राथमिक अंदाज आहे. पावसाच्या दोन दिवसांमध्येही मोठं अंतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांवर परिणाम होतो. त्यामुळेच जलयुक्त शिवारचे कामे वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यातून पडलेला पावसाचे पाणी आपण जरी थांबवू शकलो तर किमान प्रोटेक्टिवर इरिगेशन करता येईल”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“गेल्या काही वर्षातील अल निनोची जे वर्ष आहेत त्यापैकी 2015 चे वर्ष खूप कठीण होतं. त्या वर्षी मराठवाड्यात 61 टक्केच पाऊस पडला होता. अशा प्रकारची परिस्थिती आली तर काय करायला पाहिजे याबाबत प्रत्येक जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत”, असं देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं.




