
खेडच्या नारंगी नदीत मगरीचे दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण
खेड : शहरातील नारंगी नदीच्या पात्रात मगरीचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीत मुक्तपणे विहार करणारी मगर काही नागरिकांच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीसह नारंगी नदीची पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही मगर नदीत दिसू लागल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
मगरीचे दर्शन झाल्याने नदीकाठावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून लहान मुलांनी तसेच नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, मगर नदीपात्राबाहेर किंवा मानवी वस्तीत आढळल्यास तात्काळ वनविभागाला अथवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी, असे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




