
रत्नागिरी जवळील मिरजोळेत भरदिवसा घरफोडी; ९ तोळे सोन्यासह ५० हजारांची रोकड चोरी
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे परिसरात गुरुवारी भरदिवसा घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा फोडून सुमारे ९ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला.
ही घटना मिरजोळे येथील पाटीलवाडी परिसरात गुरुवारी सकाळी सुमारे ११.४५ ते दुपारी १२.३० या कालावधीत घडली. राजेश बबन भाटकर हे कामानिमित्त बाहेर असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने तसेच ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
दुपारी सुमारे १.३० वाजता राजेश भाटकर घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील दागिने आणि रोकड गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.




