धोपेश्वर श्री धुतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी


राजापूर : शहरालगत असलेल्या धोपेश्वर येथील श्री धुतपापेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान असून मंदिराच्या सुशोभीकरणानंतर येथे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी हटविण्यात यावी, अशी मागणी धोपेश्वर जिल्हा परिषद गटाच्या आढावा बैठकीत करण्यात आली.
पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक पार पडली. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत गुरव, पंचायत समिती सदस्य राजेश गुरव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उपसभापती अभिजीत गुरव यांनी विकासकामांच्या गुणवत्तेबाबत सूचना करताना, सुरू असलेल्या सर्व कामांचे पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर छायाचित्रे घ्यावीत, त्यामुळे कामांच्या दर्जाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करता येईल, असे सांगितले. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता श्री. भालेराव यांनी अनेक विकासकामांसाठी निधी उपलब्ध नसल्याने ती रखडल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कुवळेकर यांनी आमदार किरण सामंत यांच्याशी चर्चा करून आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
बैठकीत नादुरुस्त शाळांच्या दुरुस्तीचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. संबंधित शाळांचे निर्लेखन प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या. गोवळचे सरपंच अभिजीत कांबळे यांनी गोवळ येथील दोन शाळांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली.
धोपेश्वरचे सरपंच उमेश शिवगण यांनी श्री धुतपापेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणानंतर पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. सध्या रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून भविष्यात पर्यटकांची संख्या आणखी वाढणार असल्याने हा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावर प्रकाश कुवळेकर यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खासगी जमिनी असल्यामुळे रुंदीकरणात अडचणी येत असल्या, तरी आवश्यक तेथे जमीन अधिग्रहण करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच श्रावण महिना आणि पावसाळा लक्षात घेता, तोपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी हटवून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सरपंच उमेश शिवगण यांनी केली.
बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचाही आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी विभागाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठेकेदारांनी कामे सुरू केलेली नसल्याचे सांगितले. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या काही ठेकेदारांना नोटिसा बजाविण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.
यावेळी विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस विभागातील सरपंच, ग्रामसेवक, प्रशासक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button