भाजप नगरसेवकांकडून महाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना मारहाण; मारहाणीमध्ये मुख्याधिकारी जखमी

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना आज दुपारी भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांकडून त्यांच्या दालनातच बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे जखमी झाले आहेत.त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. महाड नगरपालिका कर्मचाऱ्यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर हे महाड नगरपालिकेच्या प्रशासकीय भवनातील त्यांच्या दालनात आपले काम करत असताना भाजपचे नगरसेवक सुरज बामणे आणि त्यांचे सहकारी दालनात आले. यावेळी त्यांनी प्रभागातील पाणी प्रश्नाबाबत वाद घातला. या वादामध्ये नगरसेवक सुरज बामणे, राकेश पाटील आणि अन्य एका जणाने कोळेकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.राकेश पाटील याने मारहाण करण्या बरोबरच शिवीगाळ देखील केली. यावेळी या तिघांनी मारहाण करून तुला सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. यानंतर मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. या मारहाणीमध्ये धनंजय कोळेकर जखमी झाल्याने वैद्यकीय उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या घटनेमुळे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम कसे करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button