
रत्नागिरी जिल्ह्यात ६७ ठिकाणी ’मोफत रक्त तपासणी ठप्प
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची ’लाईफलाईन’ समजली जाणारी मोफत रक्त तपासणी सुविधा अखेर कोलमडली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी रखडल्याचे कारण देत ’मे. एचएलएल लाईफकेयर लि.’ या कंपनीने १ मेपासून आपली सेवा गुंडाळली आहे. याचा थेट फटका जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून असलेल्या हजारो रुग्णांना बसला आहे. शासनाच्या या ’आर्थिक’ आजारामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणाच आता आयसीयूमध्ये गेल्याचे चित्र दिसत आहे.
२०१७ पासून सुरू असलेल्या या योजनेचा डोलारा सुरुवातीला सुरळीत होता. मात्र २०२१ पासून १५व्या वित्त आयोगाकडे हा भार सोपवण्यात आला. दुर्दैवाने २०२४-२६ या वर्षात आयोगाकडून अत्यंत तुटपुंजा निधी प्राप्त झाला. परिणामी, कंपनीची कोट्यवधींची देयके थकली आणि हतबल झालेल्या कंपनीने थेट कर्मचारी कपात करून सेवाच बंद पाडली. आता रक्त तपासणीसाठी सामान्य रुग्णांना खासगी लॅबमध्ये जाऊन हजारो रुपये मोजावे लागणार आहेत. ’आरोग्य सेवा मोफत’ हा दावा केवळ कागदावरच उरला आहे.




