श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्याचा महाभोग


अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महाभोग अर्पण करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात रांगा लावल्या होत्या.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील प्रसिद्ध आंबा व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा महानैवेद्य अर्पण केला. या मंगलदिनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
रविवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायिका विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी ८ वाजता गणेशयागही संपन्न झाला. अर्पण करण्यात आलेला आंब्याचा प्रसाद ससून रुग्णालयातील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, तसेच वृद्धाश्रम आणि दिव्यांग मुलांच्या संस्थांना वाटण्यात येणार आहे. याशिवाय मंदिरात उपस्थित भाविकांनाही हा प्रसाद दिला जाईल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button