अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात ‘जागर आठवणींचा’ मेळावा उत्साहात


रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचा मेळावा आणि मुक्त चर्चा सत्र ‘जागर आठवणींचा’ हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या वेळी जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षक-विद्यार्थ्यांनी भावनिक क्षण अनुभवले.

कार्यक्रमात माजी शिक्षक म्हणून सुशील वाघधरे, माणिक बाबर, अशोक पाटील, जलील हुश्ये, शंकर ढोले, हिराजी शेजवळ, नुरुद्दीन परकार, शिवाजीराव देशमुख, सीमा बोंद्रे, शहनाज वस्ता, अस्मिता कुलकर्णी, विशाखा सकपाळ, चिंतामणी दामले, महादेव यादव, मिनाक्षी केळकर आणि शरद आपटे यांनी सहभाग घेतला. या सर्व शिक्षकांनी आपल्या अध्यापन काळातील अनुभव, त्या वेळची रत्नागिरीतील शिक्षणाची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचा स्वभाव याबाबत मनोगत व्यक्त केले.

विशेष म्हणजे, अनेक शिक्षकांनी भावना व्यक्त करताना “पुन्हा जन्म मिळाला, तर याच महाविद्यालयात शिक्षक म्हणून सेवा करण्याची इच्छा आहे,” असे सांगत महाविद्यालयाशी असलेले नाते अधोरेखित केले.

माजी विद्यार्थिनी डॉ. शुभांगी बेडेकर यांनीही आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगत महाविद्यालयामुळे ज्ञानाचा भक्कम पाया घडल्याचे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व माजी शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष प्रा महेश नाईक, उपप्राचार्य प्रा सुनील गोसावी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा श्रीकांत दुदगीकर तसेच सुवर्ण महोत्सव समन्वयक प्रा वैभव कानिटकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दत्तात्रय वालावलकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button