एप्रिल महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू असतानाच जिल्ह्यातील तीन धरणे कोरडी पाणीसाठा ४४ टक्क्यांवर


एप्रिल महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, त्याचा थेट परिणाम जलसाठ्यांवर झाला आहे. दि. २८ एप्रिलच्या अधिकृत अहवालानुसार, जिल्ह्यातील धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा आता ४४.५६ टक्क्यांवर खाली आला आहे. जिल्ह्याची एकूण साठवण क्षमता ४१९.०९३ दलघमी असली तरी, सध्या केवळ १८६.७६३ दलघमी पाणी शिल्लक आहे, ज्यामुळे आगामी मे महिन्यात जिल्हा प्रशासनासमोर पाणी नियोजनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
वाढत्या तापमानामुळे जिल्हयातील केळंबा, पणदेरी आणि टांगर ही तीन धरणे पूर्णपणे कोरडी पडली असून तेथील साठा ०.०० टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय तळवडे (०.०२ टक्के), तेलेवाडी (०.३४ टक्के), तळवट (४.६४ टक्के) आणि कोंड्ये (५.७५ टक्के) या प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. या परिसरातील गावांना आता भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
जिल्ह्यातील काही मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये अद्याप समाधानकारक पाणीसाठा असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. ओझर धरण ८४.२४ टक्क्यांसह अव्वल असून, त्याखालोखाल गुहागर (८३.५६टक्के), चिंचवाडी (७५.३८ टक्के), गडनदी (६२.५० टक्के) आणि अर्जुना (६०.८८ टक्के).
जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प सध्या १० ते २० टक्क्यांच्या दरम्यान आहेत. यामध्ये आवाशी (१२.९९ टक्के), शेलारवाडी (१४.८९ टक्के), कोंडीवली (१६.७१ टक्के), पन्हाळे (१७.७३ टक्के) आणि साखरपा (१९.९४ टक्के) यांचा समावेश आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढल्यास हे प्रकल्पही लवकरच कोरडे पडण्याची भीती आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना विस्कळीत होऊ शकतात.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button