लोटे येथे महामार्गाच्या संपादित जागेवर अतिक्रमण; पिण्याच्या पाईपलाईनवर बांधले शौचालय


लोटे परिसरात मुंबई–गोवा महामार्गालगत एक गंभीर प्रकार उघडकीस आला असून, एमआयडीसीच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवर मातीचा भराव टाकून त्यावर थेट शौचालय बांधण्यात आले आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणी खेड तालुका भाजप अध्यक्ष विनोद चाळके यांनी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा प्रश्न आधीच चर्चेत असताना, हा प्रकार अधिक चिंताजनक ठरला आहे. एक्सेल फाट्याजवळ, महामार्गाच्या संपादित जागेतून गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवर एका ग्रामस्थाने भराव टाकून शौचालय उभारले आहे.
एमआयडीसीमार्फत लोटे, घाणेखुंट आणि परिसरातील इतर गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. संबंधित पाईपलाईन ही लोटे माळवाडी व घाणेखुंट या भागांना पाणीपुरवठा करते. त्यामुळे या पाईपलाईनवर झालेले बांधकाम अत्यंत धोकादायक मानले जात आहे.
ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते. लोटे ग्रामपंचायतीनेही एमआयडीसीकडे लेखी तक्रार करून हे बांधकाम हटवण्याची मागणी केली आहे. तसेच महामार्ग प्राधिकरणालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
तरीही अद्याप एमआयडीसी किंवा महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button