
रामपूर येथे आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी शिबिर
आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन; शेकडो नागरिकांचा लाभ
रामपूर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रामपूर येथील चैतन्य मंगल कार्यालयात आयुष्मान भारत मार्गदर्शन व आभा कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निवळकर, पंचायत समिती सदस्य व गटनेते गौरव पाटेकर, पंचायत समिती सदस्य सुप्रिया वंजारे, तालुकाप्रमुख सुभाष जाधव, विभागप्रमुख संदीप घाग, नितीन निकम, फैयाज शिरळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक व जिल्हाप्रमुख विक्रांत भास्करराव जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, गोरगरीब जनतेला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ मिळावा, यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच आभा कार्डमुळे नागरिकांचा आरोग्य इतिहास डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार भास्करराव जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. कोणतेही कुटुंब आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत विविध योजनांची माहिती जाणून घेतली व आभा कार्ड नोंदणीचा लाभ घेतला.




