देवगड तालुक्यातील कुणकेश्वरमध्ये सापडले २५० ते ३०० वर्षापूर्वीचे गंगाकुंड


दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिरापासून अवघ्या एक ते दीड कि. मी. अंतरावर असलेल्या कुणकेश्वर खालचीवाडी येथील ओहोळाजवळ पुरातन गंगाकुंड असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. हे गंगाकुंड सुमारे २५० ते ३०० वर्षांपूर्वीचे किंवा त्याहूनही प्राचीन असावे, असा अंदाज जाणकरांकडून वर्तविण्यात येत आहे.
स्थानिक ग्रामस्थ संतोष लब्दे, संतोष लाड, शरद वाळके आदींनी केलेल्या शोधमोहिमेनंतर हे गंगाकुंड निदर्शनास आले. झाडाझुडपांचा पालापाचोळा व गाळामुळे ते पूर्णतः बुजून गेले होते. हे गंगाकुंड सापडल्यानंतर याबाबतची माहिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली व कोकण इतिहास परिषदेचे रणजीत हिर्लेकर यांना देण्यात आली. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट व स्थानिकांच्या सहकार्याने तेथे साफसफाई करण्यात आली. हे गंगाकुंड साधारणतः ६०६ फूट आकाराचे आहे. तेथे विहिरीसारखी खोदाई असून त्यात पुन्हा आत ३०३ फूटाचा खोल भाग असून त्याची खोली अंदाजे ५ ते ६ फूट आहे. संपूर्ण रचना जांभ्या झाडात कोरलेली असून हे ठिकाण प्राचीन असल्याचे जाणकार सांगतात. सध्या या गंगाकुंडात सुमारे तीन फूट खोलीपर्यंत स्वच्छ, काचेसारखे पाणी साठलेले दिसत आहे.
या गंगाकुंडाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून तेथे चौकोनी पारावर जांभ्या दगडात कोरलेले शिवलिंग आहे. याबाबत प्राथमिक माहिती देताना कोकण इतिहास परिषदेचे रणजीत हिर्लेकर यांनी सांगितले, १९९२ मध्ये श्रीदेव कुणकेश्वरला करण्यात आलेल्या वज्रलेपासाही याच गंगाकुंडातील पाणी वापरण्यात आले होते. हे गंगाकुंड प्राचीन असल्याने पूर्वीच्या पाणी व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या गंगाकुंडाची साफसफाई करण्यात आल्याने त्याला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त झाली आहे, असे त्यांनी सांगितले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button