
आमदार निरंजन डावखरे यांची रत्नागिरी दक्षिण जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती
राज्यातील आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने आपली संघटनात्मक बांधणी अधिक आक्रमक करण्यास सुरुवात केली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची रत्नागिरी दक्षिण जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोकणच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची मुळे घट्ट करण्याची मोठी जबाबदारी आता डावखरे यांच्या खांद्यावर आली असून, त्यांच्या या एन्ट्रीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आमदार निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करत असले, तरी गेल्या काही काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांशी त्यांचा संपर्क तुटल्याची चर्चा खुद्द भाजप कार्यकर्त्यांमध्येच होती. निवडणुका जिंकल्यानंतर ते मतदारांना विसरले की काय, असा सूर उमटत असतानाच पक्षाने त्यांना याच भागाची जबाबदारी देऊन एक प्रकारे बॅटल ग्राऊंडवर उतरवले आहे.
www.konkantoday.com




