
रत्नागिरी शहराजवळ किल्ले रत्नदुर्ग परिसरात मद्य प्राशन करण्यास बसलेल्या मद्यपींना पोलिसांचा दणका
रत्नागिरी शहराचे प्रमुख आकर्षण असलेल्या भगवती बंदर आणि ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्ग परिसरात वाढत्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी शहर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. या परिसरात पर्यटकांच्या नावाखाली होणारी हुल्लडबाजी आणि मद्यप्राशन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली. यापुढे ही कारवाई केवळ नावापुरती मर्यादित न राहता ती नियमित स्वरूपात सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून किल्ले रत्नदुर्ग आणि भगवती बंदर पेठ परिसरात सायंकाळच्या वेळी मद्यपींचा वावर वाढल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. यामुळे सहलीसाठी येणाऱ्या कुटुंबियांना आणि पर्यटकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. ही बाब गांभीर्याने घेत शहर पोलिसांनी या भागात अचानक छापा टाकला. या मोहिमेदरम्यान काही तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना आणि धिंगाणा घालताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी स्पष्ट केले की, रत्नदुर्ग हा जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा असून त्याचे पावित्र्य राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मात्र, काही समाजकंटक या शांत आणि सुंदर परिसराचा वापर चुकीच्या कामांसाठी करत आहेत. या कारवाईमुळे अशा प्रवृत्तींना जरब बसणार आहे. पोलिसांनी आता या संपूर्ण परिसराचे विशेष नियोजन केले असून, यापुढे पेठ किल्ला परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि परिसरातील शांतता कायम राखण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल स्थानिक नागरिकांकडून स्वागतार्ह ठरत आहे. पोलिसांनी केवळ कारवाई करून न थांबता, या भागात सातत्याने लक्ष ठेवण्याचा निर्धार केल्याने मद्यपींचे धाबे दणाणले आहेत. यापुढे कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या मोहिमेमुळे आता हा ऐतिहासिक परिसर पुन्हा एकदा सर्वसामान्य पर्यटकांसाठी सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी पवार, परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक सिद्धी सावंत, पोलिस उपनिरीक्षक सागर वाळुंजकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर, प्रवीण पाटील, कुशल हातिसकर, रोहन गमरे यांनी केली.




