लांजात उड्डाणपुलास अंडरपास ठेवणार


मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील उड्डाणपुलाखाली तहसील कार्यालयासमोर तसेच धुंदरे रस्त्याजवळ किमान दोन ठिकाणी भुयारी मार्ग (अंडरपास) करण्यास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वतः मान्यता दिली असून उड्डाणपुलाला अंडरपास ठेवले जाणार आहे. याबाबत त्यांनी आमदार किरण सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत सकारात्मक शब्द दिल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघाचे क्षेत्रप्रमुख सुनिल उर्फ राजू कुरूप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
लांजा तहसील कार्यालयासमोरील मुंबई-गोवा महामार्गावर उड्डाणपुलाखालून जाणार्‍या भुयारी मार्गाला (अंडरपास ब्रिज) मंजुरी मिळालेली नसल्याची चर्चा लांजात सर्वत्र सुरू होती. तर लांजा शहर समन्वय समितीच्या पाठपुराव्यानंतरही अंडरपास झाला नसल्याने नाराजीचा सूर उमटला होता. परिणामी, विद्यार्थ्यांसह नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असून भविष्यातील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होणार असल्याचे बोलले जात असतानाच कुरूप यांनी शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे शहरातील तहसील कार्यालयासमोरील अंडरपासच्या कार्यवाहीबाबत घडामोडींची माहिती दिली.
कुरूप यांनी म्हटले आहे, ऑ गस्ट २०२५ मध्ये नागरिकांनी तहसील कार्यालयासमोरील उड्डाण पुलाला ओपन ठेवण्याची मागणी आमदार किरण सामंत यांच्याकडे केली होती. त्यानंतर आमदार सामंत तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. हे काम तातडीने करणे शक्य नसले तरी पुढील वर्षाच्या वार्षिक आराखड्यात या कामाला मंजुरी देऊन तात्काळ सुरुवात करण्यात येईल, असा ठाम शब्द नितीन गडकरी यांनी दिल्याचे कुरूप यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्यानुसार यावर्षीच्या वार्षिक आराखड्यात या कामाचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. तर धुंदरे येथेही अशाच प्रकारचा अंडरपास प्रस्तावित असून त्यालाही मंजुरी मिळणार असल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button