
भाईंदरमध्ये लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू!
भाईंदर : भाईंदरमध्ये मोकळ्या मैदानात उभारलेल्या झोपडपट्टीत आग लागून जवळपास २० सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
भाईंदर पूर्व येथील केंद्र परिसरात मोकळ्या भूखंडावर पत्र्याचे शेड उभारून झोपडपट्ट्या बांधण्यात आल्या होत्या. दरम्यान, शुक्रवारी या झोपडपट्ट्यांमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. या ठिकाणी सिलेंडरचे गोदामही असल्यामुळे एकामागून एक सिलेंडरचे स्फोट झाले. परिणामी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि आगीने मोठा भडका घेतला.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्यामुळे जवळपास तीन तास जवानांना बचावकार्य करावे लागले. दरम्यान, तीन जणांचे मृतदेह महापालिकेच्या अग्निशमन विभागाने बाहेर काढले आहेत. तसेच इतर जखमींचा शोध अद्याप सुरू आहे. मिळालेल्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.
दरम्यान, रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. अवघ्या महिन्याभरापूर्वीच मिरा रोड येथे मोकळ्या भूखंडावर आग लागल्याची घटना घडली होती. त्या घटनेत जीवितहानी झाली नव्हती, मात्र जवळील इमारतींमधील घरांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर महापालिकेने शहरातील सर्व पत्र्याचे शेड हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याची पुरेशी अंमलबजावणी न झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, पुन्हा अशी आग लागल्यामुळे शहरातील नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.



