
सागवे बुरंबे–वडपवाडी रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी
राजापूर : सागवे बुरंबे–वडपवाडी गावातील रस्त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यात साचणाऱ्या पाण्यामुळे ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी तसेच वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पावसाळ्यात या रस्त्याची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली व आकार वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, दुचाकीस्वारांना विशेषतः मोठी कसरत करावी लागत आहे. शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या खराब रस्त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असून, दैनंदिन वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे आमदार, खासदार, सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी या रस्त्याची तातडीने पाहणी करून परिस्थितीचा आढावा घ्यावा. तसेच रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून आवश्यक ठिकाणी डांबरीकरणाचे काम मंजूर करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.




