
ताम्हाने-कोसुंब रस्त्यावर भीषण अपघात; आंबवलीतील तरुणाचा जागीच मृत्यू
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने-कोसुंब मार्गावर चिरे वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आंबवली येथील प्रतीक सावंत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, १९ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चिरे वाहून नेणाऱ्या MH 07 1170 क्रमांकाच्या ट्रकची मोटारसायकलला धडक बसली. या अपघातात प्रतीक सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.
ताम्हाने-कोसुंब मार्गावर चिरे वाहून नेणाऱ्या ट्रकची नियमित वाहतूक सुरू असते. या ट्रकचा वेग, वाहनांचा फिटनेस तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी याबाबत परिसरातील नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चिरे वाहतूक करणारे ट्रक अनेकदा भरधाव वेगाने धावत असल्याने या मार्गावर अपघाताचा धोका वाढला असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
याशिवाय ताम्हाने-कोसुंब रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. खराब रस्ता आणि भरधाव अवजड वाहनांची वाहतूक यामुळे या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांची फिटनेस, कागदपत्रे आणि वेगाची तातडीने तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, तसेच रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी परिसरातून होत आहे. प्रतीक सावंत यांच्या मृत्यूमुळे आंबवली गावावर शोककळा पसरली आहे.




