
गणेशोत्सवापूर्वी ओणी-अणुस्कुरा घाट मार्गाची दुरुस्ती करा
पाचल तालुका निर्मिती कृती समितीचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना निवेदन : खड्ड्यांमुळे वाहतुकीला धोका
राजापूर : तालुक्यातील ओणी-पाचल-अणुस्कुरा घाट मार्गाची दिवसेंदिवस होत असलेली दुरवस्था लक्षात घेता, या मार्गाची तातडीने डागडुजी व दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पाचल तालुका निर्मिती कृती समितीने सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे. समितीचे कार्यालयीन सचिव तुषार पाचलकर यांनी १८ ऑगस्ट रोजी याबाबत निवेदन सादर केले.
राजापूर तालुक्यातून जाणारा राज्य मार्ग क्रमांक १५५ हा या परिसरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी तसेच अवजड वाहनांची वाहतूक होते. प्रमुख आंबा घाट मार्गावरील वाहतुकीच्या अडचणींमुळे ओणी-अणुस्कुरा घाट मार्गावरही वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून पृष्ठभागाची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था अधिकच वाढत असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे.
ओणी-पाचल-अणुस्कुरा घाट मार्ग हा राजापूर तालुक्यातील नागरिकांसाठी तसेच कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यासह आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण व अन्य दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, या काळात कोकणात चाकरमानी व प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच ओणी-अणुस्कुरा घाट मार्गाची आवश्यक ती दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित व सुरळीत करावी, अशी आग्रही मागणी समितीने केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या मार्गाची पाहणी करून दुरुस्तीचे काम विलंब न करता पूर्ण करावे. मागणीची दखल घेऊन त्वरित कार्यवाही न झाल्यास नागरिकांना आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागू शकते, असा इशाराही पाचल तालुका निर्मिती कृती समितीने दिला आहे.
आता सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीची कितपत दखल घेतो आणि गणेशोत्सवापूर्वी प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू होते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




