
हातिवले टोलनाका पुन्हा सुरू होणार; टोलमाफीच्या मागणीने वातावरण तापले
स्थानिकांना संपूर्ण टोलमाफी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर स्थानिक वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिक आणि वाहतूकदारांना टोलमाफी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी दिला आहे.
हातिवले येथे मुंबई-गोवा महामार्गावर टोलनाका उभारण्यात आला आहे. मात्र, स्थानिक वाहनांना टोलमाफी मिळावी या मागणीसाठी सुमारे पाच वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर टोलनाका अद्याप कार्यान्वित झालेला नाही. स्थानिकांना टोलमाफी देण्याबाबतही ठोस निर्णय झालेला नाही.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोलनाका सुरू झाल्यानंतर हातिवले टोलनाकाही पुढील महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला स्थानिकांच्या टोलमाफीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
राजापूर शहरात तालुक्यातील नागरिकांची विविध कामांसाठी दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते. अनेकांना दिवसातून एकापेक्षा अधिक वेळा शहरात येणे-जाणे करावे लागते. हातिवले टोलनाका सुरू झाल्यास या वाहनचालकांवर वारंवार टोल भरण्याचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे टोलमाफीसाठी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप या मागणीवर ठोस निर्णय झालेला नसल्याने टोलनाका सुरू करण्याच्या हालचालींमुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे.
स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि वाहतूकदारांना संपूर्ण टोलमाफी देण्याचा निर्णय घेऊनच हातिवले टोलनाका सुरू करण्यात यावा. टोलमाफीचा निर्णय न घेता टोलनाका सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अरविंद लांजेकर यांनी दिला आहे.
त्यामुळे हातिवले टोलनाका सुरू करण्यापूर्वी स्थानिकांच्या टोलमाफीच्या मागणीवर प्रशासन आणि संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोणता निर्णय घेते, याकडे राजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.




