
सुवर्णपदक विजेती स्पृहा भावेचा भाजपाच्या वतीने सत्कार
रत्नागिरी : बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक संघटना आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी स्पृहा तेजराज भावे रत्नागिरी जिल्ह्यामधून एकमेव सुवर्णपदक विजेती ठरली असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. भारतीय जनता पार्टी (भाजपा) रत्नागिरी शहराने याची दखल घेऊन शहर मंडळाच्या वतीने स्पृहाचा सत्कार करण्यात आला.
गेली सुमारे ४५ वर्षांहून अधिक काळ बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक संघटना शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन अभ्यासासाठी जागृती निर्माण होण्यासाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा इयत्ता सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करीत आहे. विद्यार्थ्यांच्या बायोडेटाच्या माध्यमातून त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अन्य पैलूंचीही नोंद घेतली जाते. या मानांकित स्पर्धेमध्ये देशभरातून लाखांहून अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनी भाग घेत असतात. विभागीय स्तरावर या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना कोल्हापूर विभाग नेमण्यात आला होता. स्पर्धेमध्ये सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला या विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्या परीक्षेमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यानंतर कोल्हापूर येथे प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. यात रत्नागिरी जिल्ह्यामधील ४ स्पर्धक उत्तीर्ण झाले.
यानंतर स्पर्धेच्या पुढील टप्प्यावर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संघटनेकडून एक विषय दिला गेला. त्याबाबत विद्यार्थ्यांनी स्वत: अभ्यास करून स्वत: मिळविलेल्या माहितीनुसार त्या प्रकल्पाची माहिती स्वहस्ताक्षरामध्ये लिहून, थोडक्यात तो शोधनिबंध मुंबई येथील स्पर्धा समितीकडे पाठवला. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्प अहवालविषयक एक आणि सर्वसामान्य ज्ञानविषयक दुसरी मुलाखत घेण्यात आली आणि त्यानंतर विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली.
बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाने आयोजित केलेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या अभिमानास्पद उपक्रमात यावर्षी एक लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यंदाच्या स्पर्धेची थीम पृथ्वी प्रणाली आणि मानवी कृती (हस्तक्षेप) असा होता. या विषयावर माणसाच्या हस्तक्षेपामुळे नैसर्गिक संपत्तीमध्ये कसे परिणाम होतात याबाबतचा प्रकल्प सादर करावयाचा होता.
स्पृहा भावे हिने “शाश्वत शेती आंब्याची दिशा कोकणच्या विकासाची” असे घोषवाक्य घेऊन कोकणातील नगदी पीक आंबा, त्याची सध्याची परिस्थिती, रासायनिक खते, औषधे याचे दुष्परिणाम, पीकाचे कमी होणार उत्पादन आणि त्याबरोबर सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीनेच आंबा पीकाची देखभाल करणे कसे फायद्याचे होऊ शकेल व त्याबाबतची उपाय योजना याविषयीचा प्रकल्प अहवाल सादर केला होता.
या प्रकल्पासाठी रत्नागिरी येथील डॉ. स्वप्नजा मोहिते, नारळसंशोधन केंद्राचे डॉ. किरण मालशे आणि कीटक शास्त्राचे डॉ. वानखेडे, कृषी अधिकारी विनोद हेगडे, तंत्रज्ञ काळे, प्रा. मंगल पटवर्धन, डॉ. संजय केतकर, तसेच आंबा बागायतदार अमित मुळ्ये, पराग गोगटे, गांडूळ खताची निर्मिती करणाऱ्या भारती जोशी, कलाशिक्षक श्री. पावसकर यांसह फाटक हायस्कूलचे सर्व शिक्षक आणि संस्थाचालकांचे बहुमूल्य सहकार्य लाभले होते.
सन २०२५ – २६ च्या स्पर्धेमध्ये या सर्व स्पर्धा प्रक्रियेमधून भाग घेऊन स्पृहा भावे हिला ५ एप्रिल रोजी मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, सरंक्षण मंत्रालयातील निवृत्त डीआरडीओ सह संचालक डॉ. ए. जी. नगरकर यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
यानिमित्त भाजपाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे, संदीप सुर्वे, निलेश आखाडे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा पदाधिकारी शेखर लेले, राजेंद्र पटवर्धन, राजन फाळके, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे, प्रज्ञा टाकळे, शोभा शिरोळे, सारिका शर्मा, डॉ. मुक्ता बाष्टे, विजय माळवदे, प्रसाद बाष्टे, संदीप मांडवकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.




