नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत,


नाशिक दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका खाजगी क्लासचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणगौरव समारंभ आटोपून घरी परतत असताना, विद्यार्थ्यांसह पालकांची कार विहिरीत कोसळून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला.मृतांमध्ये ७ विद्यार्थी आणि २ पालकांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील रहिवासी असलेले दरगोडे कुटुंब आणि काही विद्यार्थी दिंडोरी शहरात एका खाजगी शिकवणीच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास हे सर्वजण कारने (क्र. MH15-JS-1053) गावाकडे परतत होते. यावेळी शिवाजी नगर भागातील राजू राजे यांच्या मालकीच्या पाण्याने भरलेल्या उघड्या विहिरीत ही कार थेट कोसळली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने धाव घेतली. विहिरीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने आणि रात्रीचा अंधार असल्याने कार शोधण्यात अडचणी येत होत्या. तब्बल तीन हायड्रा क्रेनच्या साहाय्याने रात्री १२ वाजेच्या सुमारास ही कार विहिरीबाहेर काढण्यात यश आले. यावेळी बघ्यांच्या गर्दीमुळे प्रशासनाला कामात काही काळ अडथळा निर्माण झाला होता.

कार बाहेर काढल्यानंतर त्यातील ९ जणांचा गुदमरून व बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. या भीषण अपघातात इंदोरे गावातील एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. ​उपलब्ध झालेली मृतांची नावे सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे (इतर ४ मृतांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button