रत्नागिरी उपकेंद्राची अवस्था बिकट


मुंबई विद्यापीठाचे कोकणातील सर्वात जुने उपकेंद्र असलेल्या रत्नागिरी केंद्राच्या अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उच्च शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी शासनाने आणि विद्यापीठाने येथे कोट्यवधी रुपये खर्च करून पायाभूत सुविधा उभारल्या मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी नसल्याने या भव्य इमारती आणि वर्गखोल्या ओस पडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
नुकत्याच झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, रत्नागिरी उपकेंद्रातील विविध अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या एकूण १२० जागांपैकी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये केवळ १० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन वर्षांत ही संख्या सातत्याने घटत आहे. २०२२-२३ मध्ये ५३ असलेले प्रवेश २०२३-२४ मध्ये १३ वर आले आणि आता हा आकडा केवळ १० वर स्थिरावला आहे. १९८९ मध्ये स्थापन झालेल्या या उपकेंद्रात २००४-०५ पासून प्रत्यक्ष शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू झाले होते. दोन दशकांनंतरही विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यात हे केंद्र अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.
युवा सेनेचे सिनेट सदस्य मिलिंद साटम यांनी ही माहिती सभागृहात मांडली. नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी जुन्या अभ्यासक्रमांची काय स्थिती आहे, हे पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाने आपला संपर्क वाढवला नाही, तर ही सर्व साधनसामग्री आणि पैसा वाया जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. जर विद्यार्थी संख्या वाढवता येत नसेल, तर हे अभ्यासक्रम स्थानिक महाविद्यालयांना जोडले जावेत किंवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून खर्चाचा अपव्यय यांबेल, अशी मागणीही त्यांनी केली.
केवळ रत्नागिरीच नव्हे, तर शेजारील सिंधुदुर्ग उपकेंद्राची अवस्थाही फारशी समाधानकारक नाही. तेथे ८० जागांपैकी केवळ ३७ जागा भरल्या आहेत. एम.एस्सी. आयटी सारख्या तांत्रिक अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button