
कोकण रेल्वेची मान्सूनपूर्व तयारी पूर्ण
सीएमडी संतोष कुमार झा यांच्याकडून मार्गाची सविस्तर पाहणी


रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील मुसळधार पाऊस आणि येथील डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, पावसाळ्यात रेल्वे वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या नेतृत्वाखाली १० आणि ११ मार्च रोजी संपूर्ण मार्गाची वार्षिक मान्सूनपूर्व तांत्रिक तपासणी करण्यात आली.
ही पाहणी दोन टप्प्यांत पार पडली. पहिल्या टप्प्यात १० मार्च रोजी मडगाव ते ठोकूर दरम्यानच्या मार्गाची, तर दुसऱ्या टप्प्यात ११ मार्च रोजी मडगाव ते रोहा दरम्यानच्या उत्तर विभागाची तपासणीकरण्यात आली.
यावेळी विविध विभागांचे संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्याच्या काळात निर्माण होणारी आव्हाने आणि सुरक्षित रेल्वे सेवा सुनिश्चित करण्याच्या हेतूने या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते.
तपासणी दरम्यान पथकाने रेल्वे मार्गावरील तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये पायाभूत सुविधा (ट्रॅक, पूल, बोगदे आणि रेल्वे स्थानकांतील सोयीसुविधा), असुरक्षित ठिकाणे (दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या कटिंग्ज, उतारावरील ठिकाणे आणि पाणी साचण्याची शक्यता असलेल्या क्षेत्रांची पाहणी), सुरक्षा यंत्रणा (सिग्नलिंग सिस्टीम आणि खबरदारीचे उपाय म्हणून बसवण्यात आलेल्या सौर प्रकाश यंत्रणा), देखभालीची कामे (मार्गावर सध्या सुरू असलेल्या दुरुस्ती आणि पावसाळ्यापूर्वीच्या प्रतिबंधात्मक कामांची गती) यांचा समावेश आहे.
कोकण रेल्वेचा मार्ग निसर्गरम्य असला तरी पावसाळ्यात येथे दरडी कोसळणे किंवा पाणी साचण्याचे मोठे आव्हान असते. सीएमडी संतोष कुमार झा यांनी या संवेदनशील ठिकाणांना भेटी देऊन तेथील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश दिले. मुसळधार पावसातही प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि विश्वासार्ह व्हावा, यासाठी रेल्वे नेटवर्क पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.




