दहावीची प्रश्नपत्रिका फुटली की नाही? राज्य मंडळाचे घटनाक्रमासह सविस्तर स्पष्टीकरण!

SSC Exam 2026 : राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेतील गणित भाग १ आणि गणित भाग २ या दोन विषयांची प्रश्नपत्रिका अज्ञाताने समाजमाध्यमात प्रसारित केल्याच्या घटनेबाबत राज्य मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ‘गणित भाग १ आणि गणित भाग-२ या विषयांची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापुर्वी प्रसारित झाल्याची तक्रार अद्यापर्यंत प्राप्त झालेली नाही, प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसणूक करण्याचा प्रकार असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असून, प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही,’ असे राज्य मंडळाने स्पष्ट केले.

राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा सुरू आहे. पुणे विभागीय कार्यालयातील अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर (वय ५३) यांनी समाजमाध्यमातील एका समूहावर दहावीच्या गणित भाग-१ आणि गणित भाग-२ या दोन प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी समाजमाध्यमातील संबंधित समूहचालक (ॲडमिन), समूहातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्टीकरणाद्वारे सविस्तर घटनाक्रम मांडून प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे स्पष्ट केले.

राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी राज्य मंडळाकडे समाजमाध्यमात गणित भाग एक, गणित भाग दोन या विषयांच्या प्रश्नपत्रिकाप्रसारित झाल्याची तक्रार प्राप्त झाली. या बाबत संबंधित दुव्यावर पडताळणी केली असता ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६’ या नावाच्या समूहावर ६ मार्च गणित भाग-१ ची प्रश्नपत्रिका आदल्या दिवशी प्रसारित झाल्याचे दाखविण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात ही प्रश्नपत्रिका आदल्या दिवशीच प्राप्त झाल्याची शहानिशा झालेली नाही. पोलिस त्या बाबत तपास करत आहेत. संबंधित दुव्यावर ९ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेतील गणित भाग-२ ची प्रश्नपत्रिका उपलब्ध होईल असा संदेश ६ मार्च रोजी सायंकाळी ४.५६ वाजता प्राप्त झाल्याचे दिसून आले.

संबंधित प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी डीएम टू मी असा संदेश नमूद करण्यात आला होता. त्यानंतर त्या दुव्यावर ९ मार्च रोजी रोजी सायंकाळी ५.४७ वाजता पडताळणी केली असता समूहातील संशयिताकडून गणित भाग-२ प्रश्नपत्रिकेच्या दुव्याच्या पीडीएफखाली पासवर्ड नमूद केल्याचे दिसून आले. ती पीडीएफ उघडली असता गणित भाग-२ चा पेपर उपलब्ध असल्याचे दाखविण्यात आले. गणित भाग-२ ची प्रश्नपत्रिका त्या समूहावर त्या दिवशी गणिताची परीक्षा झाल्यानंतर उपलब्ध झाली, असे राज्य मंडळाने नमूद केले.

समूहावर ९ मार्च रोजी सायंकाळी ५.४७ वाजता विज्ञान १ आणि विज्ञान २ प्रश्नपत्रिका उपलब्ध असा संदेश प्रसारित करण्यात आला. या दरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे तत्काळ पुणे विभागीय मंडळामार्फत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच या संदर्भात पडताळणी करण्यासाठी १० मार्च रोजी पुणे विभागीय मंडळ, पोलिसांकडून संबंधित समूह चालकाला ११ मार्च रोजीच्या विज्ञान १ची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी संदेश पाठवून मागणी केलेली ६०० रुपये रक्कम देण्यात आली. मात्र, ११ मार्च रोजी सकाळी विज्ञान १ची परीक्षा सुरू होईपर्यंत समूहचालकाने प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेली नाही. या बाबत पोलीस विभागाकडून तपास सुरू आहे, असे राज्य मंडळाचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमातील समूहावर गणित भाग-२ आणि विज्ञान भाग-१ या विषयांची परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याचे दिसून येत नाही. गणित भाग २ ची प्रश्नपत्रिका ९ मार्च रोजी परीक्षा झाल्यानंतर समूहावर टाकण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य मंडळाची कोणतीही प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी समाजमाध्यमातील समूहात उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचा उद्देश सकृतदर्शनी दिसून येतो. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button