रत्नागिरी जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज (९ मार्च) शहरातील कोकणनगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी बोलताना श्रीमती रानडे म्हणाल्या, “यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात ९ ते १४ वर्ष वयोगटातील दहा हजारांहून अधिक मुलींनी एचपीव्ही लस घेतली असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत; मात्र सध्या समाजमाध्यमांवर एचपीव्ही लसीकरणाबाबत काही दिशाभूल करणारे व्हिडीओ व संदेश प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवावा. तसेच १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींनी ही लस घ्यावी व पालकांनीही आपल्या मुलींना लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा.”
या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, कोकणनगर नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरगोजे, डॉ. अझर शेख, डॉ. नूतन सातघरे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, तसेच लाभार्थी व पालक उपस्थित होते.
एचपीव्ही हा महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण मानला जातो. एचपीव्ही लस घेतल्यास या कर्करोगापासून प्रभावी संरक्षण मिळते. ही लस मोफत उपलब्ध असून १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींनी लसीकरण करून आपल्या आरोग्याचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले. अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कोकणनगर नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरगोजे यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य सहाय्यक चेतन शेट्ये यांनी सूत्रसंचालन केले तर वैद्यकीय अधिकारी डॉ. नूतन सातघरे यांनी आभार प्रदर्शन केले.
लसीकरणासाठी उपलब्ध ठिकाणे : प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शाळांमध्ये आयोजित विशेष लसीकरण सत्रे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button