
राजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी नंदिनी कदम, उपसभापतीपदी अभिजीत गुरव यांची बिनविरोध निवड

राजापूर : पंचायत समितीच्या सभापतीपदी नाटे गणाच्या सदस्या नंदिनी नितीन कदम यांची, तर उपसभापतीपदी धोपेश्वर पंचायत समिती गणाचे भाजपचे सदस्य अभिजीत गुरव यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर महायुतीच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
राजापूर पंचायत समितीच्या बारा जागा असून महायुतीने सर्व जागा जिंकल्या आहेत. त्यामध्ये शिवसेनेच्या अकरा तर मित्र पक्ष भाजपची एक जागा यांचा समावेश आहे.
राजापूर पंचायत समितीचे सभापतीपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे यापूर्वी जाहीर झाले होते. त्यानंतर झालेल्या पंचायत समिती गणांच्या आरक्षणामध्ये राजापूर तालुक्यातील नाटे आणि ताम्हाणे या दोन गणांचा त्यामध्ये समावेश होता. त्यामध्ये नाटे पंचायत समिती गणाच्या सदस्या नंदिनी कदम यांना राजापूरच्या सभापतीपदाची पहिली संधी लाभली आहे. तर धोपेश्वर पंचायत समिती गणाचे भाजपचे निवडून आलेले एकमेव सदस्य अभिजीत गुरव यांना उपसभापती पदासाठी निवड झाली.
आज (९ मार्च) राजापूर पंचायत समितीच्या किसान सभागृहात सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजापूरच्या प्रांताधिकारी डॉ. जस्मिन, राजापूरचे प्रभारी गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप आणि समस्त अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी सभापती पदासाठी नंदिनी कदम, तर उपसभापती पदासाठी अभिजीत गुरव यांच्या व्यतिरिक्त कुणाचेच अर्ज सादर झाले नव्हते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित होते. दुपारी ३.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जस्मिन यांनी राजापूरच्या सभापतीपदी नंदिनी कदम यांची, तर उपसभापतीपदी अभिजीत गुरव यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यावेळी सर्व उपस्थित पंचायत समिती सदस्य आणि महायुतीचे पदाधिकारी यांनी जोरदार स्वागत केले.
राजापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक झाल्यानंतर नूतन सभापती नंदिनी कदम यांनी तर उपसभापती अभिजीत गुरव यांनी पंचायत समितीमधील आपापल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी उपस्थित शिवसेना-भाजपच्या वतीने दोघांचेही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक विलास चाळके, तालुकाप्रमुख दीपक नागले, लांजाचे राजू कुरूप, भाजपचे तालुकाध्यक्ष मोहन घुमे, भाजपच्या प्रदेश सदस्या शिल्पा मराठे, श्रुती ताम्हनकर, अनिल करगुटकर, सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, महायुतीचे पदाधिकारी आदी उपस्थिती होते.
राजापूरच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित असलेल्या राजापूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. जस्मिन यांनी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या आणि राजापूर तालुक्यातील विकास विषयक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा अपेक्षा व्यक्त केल्या.




