
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश काढले
सिधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शिक्षक समितीच्या मागणीनंतर आता जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.कोकणात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही गंभीर परिस्थिती ओळखून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांनी केलेल्या मागणीला यश आले असून, प्रशासनाने सोमवारपासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश काढले आहेत.
सोमवारपासून नवीन वेळापत्रक लागू
वाढत्या उष्णतेमुळे लहान मुलांना दुपारच्या उन्हात प्रवास करणे कठीण जात होते. यावर उपाय म्हणून सोमवार, 9 मार्च 2026 पासून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा खालील वेळेनुसार भरतील. शाळेची वेळ सकाळी 7 ते 11.15 असणार आहे. दुपारच्या कडाक्याच्या उन्हापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे हा यामागचा उद्देश आहे.




