
५ मार्चपासून महाराष्ट्र ठप्प होणार? ई-चलनविरोधात लाखो वाहनधारक रस्त्यावर येण्याचा इशारा
राज्यातील ई-चलन कार्यप्रणालीविरोधात दीर्घकाळ साचलेला रोष अखेर मुंबई येथे झालेल्या बैठकीत उघडपणे फुटला आहे. महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट अॅक्शन कमिटीच्या वाशी येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत सरकारविरोधात थेट संघर्षाची घोषणा करण्यात आली, अशी माहिती अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघचे अध्यक्ष भरत पोखरकर यांनी दिलीया बैठकीला राज्यभरातील ट्रक मालक, व्यावसायिक वाहन संघटना, चालक प्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बैठक केवळ संघटनात्मक कार्यक्रम न राहता सरकारी धोरणाविरोधातील व्यापक शक्तिप्रदर्शन करणारी ठरली. या बैठकीत एकमुखाने निर्णय घेत 5 मार्चपासून राज्यव्यापी संप छेडण्याचा इशारा देण्यात आला.
मुंबईतील आझाद मैदान येथे एक ते दीड लाख वाहने एकत्र आणून ऐतिहासिक आंदोलन उभारण्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली. सरकारने तातडीने तोडगा काढला नाही, तर राज्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प करण्याचा इशारा देत संघटनांनी संघर्षाची दिशा स्पष्ट केली.
या सभेला अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघचे अध्यक्ष भरत पोखरकर, सचिव गणेश शिंदे, उपसचिव गोरक्ष वाफारे, संजय ढवळे, बाप्पू ढेंबरे, सुरेश पानमदं तसेच प्रसन्ना पटवर्धन, प्रविण पैठणकर, राजेंद्र वणवे, बाबाजी शिंदे, कैलास पिंगळे यांसह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने संप व आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
चुकीच्या दंडामुळे केवळ व्यावसायिक वाहनधारकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही त्रस्त आहेत. दंड भरावा की सरकारी कार्यालयांच्या फेर्या माराव्यात, असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहत आहे. डिजिटल प्रणाली असूनही तक्रार निवारण प्रक्रिया संथ व गुंतागुंतीची असल्याची टीका वाहतूकदारांच्या बैठकीत करण्यात आली.
वाहतूक क्षेत्र ठप्प झाल्यास त्याचा थेट परिणाम उद्योग, बाजारपेठ, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. त्यामुळे 5 मार्चपूर्वी सरकारने संवाद साधून तोडगा काढणे अत्यावश्यक आहे. संपाची हाक प्रत्यक्षात आली, तर महाराष्ट्रात वाहतूक क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघर्ष ठरू शकतो. आता सरकार संवादाचा मार्ग स्वीकारते की संघर्षाला सामोरे जाते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.




