
राज्य शासनाचा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय
राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वी 55 टक्के असलेला महागाई भत्ता आता 58 टक्के झाला आहे.वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत याबाबत विधायक निवेदन सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याने राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महागाई वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या खिशात थोडे जास्त पैसे येणार आहेत.
एकदम मोठी रक्कम हातात येणार
ही महागाई भत्त्याची वाढ जुलै 2025 पासून लागू करण्यात आली आहे. जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या चार महिन्यांची थकबाकी मार्च 2026 मध्ये एकदम अदा केली जाईल. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीची थकबाकी मात्र स्वतंत्र सरकारी आदेश काढून नंतर दिली जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांना एकदम मोठी रक्कम हातात येणार असून त्यांच्या आर्थिक अडचणी कमी होतील.
निर्णयाचा फायदा कोणाला?
या निर्णयाचा फायदा सुमारे 5.96 लाख कार्यरत शासकीय कर्मचारी आणि 8.12 लाख निवृत्त कर्मचारी-निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.
50 हजार रुपये पगार असल्यास?
उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा मूलभूत पगार 50 हजार रुपये असेल तर पूर्वी महागाई भत्ता 27 हजार 500 रुपये (55%) मिळत होता. आता तो 29 हजार रुपये (58%) होईल. म्हणजे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जादा पगार मिळेल. एकूण पगारात ही 1500 रुपयांची वाढ होईल आणि वर्षभरात 18 हजार रुपये जादा मिळतील. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी हा निर्णय खूप उपयुक्त ठरलाय. महागाईमुळे रोजच्या खर्चात वाढ झाली होती. आता महागाई भत्त्यात वाढ झाल्याने किराणा, शिक्षण, आरोग्य अशा गरजा भागवणे सोपे होणार आहे.




