
मुन्ना देसाईंवरील कारवाईला विरोध करत व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या परशुराम कदम यांच्यावर गुन्हा दाखल
रत्नागिरी : हातखंबा येथील मुन्ना देसाई यांच्या प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावाला विरोध करत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी हातखंबा येथील परशुराम मारुती कदम यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कोणाला आपल मत मांडण्याचा अधिकार नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान १८ फेब्रुवारी रोजी केदार उर्फ मुन्ना मधुसूदन देसाई यांच्यावर तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून मांडण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर परशुराम कदम व त्यांच्या मित्रपरिवाराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसारित करून, सदर कारवाई थांबवली नाही तर रस्ता अडवून आंदोलन करण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला होता. या व्हिडीओची दखल पोलिसांनी घेतली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुन्ना देसाई यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन तसेच सध्या त्यांच्या हालचालींमुळे शांतता भंग व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, कायद्याने चॅप्टर केस अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई थांबवण्याच्या उद्देशाने १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता हातखंबा गावातून संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला, असा पोलिसांचा दावा आहे.
या व्हिडीओद्वारे फौजदारी स्वरूपाचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे नमूद करत पोलिसांनी परशुराम कदम यांच्याविरोधात कारवाई केली आहे. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.




