माळवाशीतील डाक कर्मचाऱ्यांचा सत्कार

देवरूख :

रत्नागिरी विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या माळवाशीतील पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. डाक विभागाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवून जिल्ह्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पोस्टमास्तर बाळकृष्ण करंडे व पोस्टमन रमेश जौरत यांना गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात हा सत्कार समारंभ झाला. भारतीय डाक विभागाच्या प्रत्येक ड्राईव्हमध्ये सहभाग घेऊन चांगली कामगिरी करणाऱ्या ब्रँच ऑफिसमध्ये माळवाशी पोस्ट ऑफिस अनेक वेळा अग्रस्थानी असते. रत्नागिरी विभागात सर्वात जास्त खाती उघडून माळवाशीने पहिला क्रमांक पटकावला आहे. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ 100 टक्के लाभार्थ्यांना मिळवून दिला आहे. पोस्टाची सेवा व योजना, राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी सकारात्मकपणे केली जात आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल पणजी-गोवा विभागाचे डायरेक्टर आर. पी. पाटील, जिल्हा डाक अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी,
वरिष्ठ अधिकारी कडगावकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मनोगतात बाळकृष्ण करंडे म्हणाले, डाक विभाग हा विश्वासाचा विभाग आहे. पोस्टाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही बचतगट, वाड्यांतील मंडळे यांना भेटलो. योजना समजावून सांगितल्या. यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पोस्टमन रमेश जौरत व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

गावच्या सरपंच निकिता करंडे, उपसरपंच सुनील सावंत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, दिलीप कडू व ग्रामस्थ यांच्यावतीनेही सत्कार करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button