
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोंदा- रेडी मार्गावर भरधाव कार गटारात कोसळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोंदा- रेडी मार्गावर आदर्शनगर येथे भरधाव कार अनियंत्रित होऊन गटारात कोसळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. नारायण बाबाजी नाईक (42, रा. आरोंदा आग्राळवाडी) असे मृत चालकाचे नाव असून, कारमधील सोबत असलेला रत्नाकर गंगाराम नाईक (रा.आरोंदा) हा किरकोळ जखमी झाला आहे.हा अपघात सोमवारी सकाळी 8.30 वा.च्या सुमारास झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण नाईक हे मारुती 800 कार घेऊन आरोंदा ते रेडी जात होते. आरोंदा-आदर्शनगर येथे सरळ रस्त्यावर त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डाव्या बाजूला गटारात जाऊन जोरात धडकली. यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले रत्नाकर गंगाराम नाईक हे किरकोळ जखमी झाले आहेत.




