
गोविंदगडावर १९ रोजी शिवजन्मोत्सव सोहळा
विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन
चिपळूण : चिपळूणचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक दुर्ग गोविंदगड (गोवळकोट) येथे दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट व गोवळकोट ग्रामस्थ यांच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे १२ वे वर्ष असून, या निमित्ताने शिवचरित्राचा जागर, इतिहासाची उजळणी आणि पारंपरिक कलेचे दर्शन घडविणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन गुरुवारी (१९ फेब्रुवारी) करण्यात आले आहे.
या शिवजन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात सकाळी ७ वाजता ऐतिहासिक दुर्ग गोविंदगडाचे पूजन, गडदेवता श्री देवी रेडजाई मातेचे पूजन तसेच ध्वजपूजनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवप्रतिमेचे विधिवत पूजन व आरती संपन्न होईल. सकाळी १० वाजल्यापासून कोकण दौलत प्रतिष्ठान, चिपळूण यांचे शिवकालीन शस्त्रप्रदर्शन तसेच पुरातन वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आहे. यातून शिवकालीन युद्धकला, शस्त्रसज्जता आणि तत्कालीन जीवनपद्धतीची माहिती नागरिकांना व तरुण पिढीला मिळणार आहे. इतिहासाची ओळख प्रत्यक्ष पाहण्याच्या माध्यमातून करून देण्याचा हा एक महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.
सायंकाळी ६ वाजता प्रमुख मान्यवरांचा सत्कार समारंभ व विविध ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता शंभू राजे मर्दानी खेळ विकास मंच (कोल्हापूर) यांच्या वतीने पारंपरिक मर्दानी खेळांचे सादरीकरण होणार असून, यामध्ये तलवारबाजी, लाठीकाठी व अन्य शौर्यकलेचे प्रकार सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमातून शिवकालीन पराक्रम आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या शिवजन्मोत्सव सोहळ्यास जास्तीत जास्त शिवप्रेमी, गडप्रेमी, इतिहासप्रेमी तसेच सर्व नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट व गोवळकोट ग्रामस्थांनी केले आहे.



