
जयगड साखरी बौद्धवाडी येथे घडलेल्या ४ लाख ८२ हजार रुपयांच्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणी पोलिसांनी केली दोन भामट्याना अटक
ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे दोन भामटे दहिसरमधून गजाआड
साखरी येथील ४.८२ लाखांच्या अपहारप्रकरणी मुसक्या आवळल्या; तांत्रिक तपासाला मोठे यश
रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाने ऑनलाईन बँकिंगद्वारे सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई करत दोन सराईत आरोपींना मुंबईतील दहिसर परिसरातून अटक केली आहे. जयगड पोलीस ठाणे हद्दीतील साखरी बौद्धवाडी येथे घडलेल्या ४ लाख ८२ हजार रुपयांच्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली असून, यामुळे ऑनलाईन भामट्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, १७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२६ या कालावधीत फिर्यादीच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ८२ हजार रुपये अज्ञात इसमांनी ऑनलाईन पद्धतीने लंपास केले होते. याप्रकरणी २१ मार्च रोजी जयगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता-२०२३ च्या विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्याकडे या तपासाची धुरा सोपवण्यात आली होती.
तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक अभय तेली आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजचा कसून अभ्यास केला. तपासाची चक्रे फिरवत असताना या गुन्ह्याचे धागेदोरे मुंबईतील दहिसर परिसरात असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दहिसर (पूर्व) येथून दुर्गेश चम्मण रॉय (वय ४८) आणि अर्जुन रामसुंदर चौहान (वय ३८) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी फिर्यादीच्या खात्यातून रक्कम काढल्याची कबुली दिली. त्यानंतर शुक्रवारी, १७ एप्रिल रोजी मध्यरात्री या दोन्ही आरोपींना रीतसर अटक करण्यात आली. या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अभय तेली, पोलीस अंमलदार संदेश मोंडे आणि सायबर पोलीस ठाण्याच्या दूर्वा शेटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे रत्नागिरी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत असून, या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.



