
आई देवी भराडी, तुझी छत्रछाया आम्हावर सदैव राहो!
देवीचरणी भाविकांचे साकडे; १० लाखांहून अधिक भाविक मातेच्या चरणी नतमस्तक
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीचा वार्षिक यात्रोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाला. आई भराडी देवीच्या जयघोषाने संपूर्ण आंगणेवाडी परिसर दुमदुमून गेला होता. दोन दिवसांच्या या सोहळ्यात सुमारे १० लाखांहून अधिक भाविकांनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आपले नवस फेडले.
यात्रेचा सर्वात महत्त्वाचा आणि धार्मिक विधी असलेला ‘ताटे लावण्याचा’ कार्यक्रम सोमवारी (ता. ९) रात्री ९ ते १ यावेळेत मोठ्या थाटात पार पडला. देवीच्या मानकऱ्यांच्या सौभाग्यवतींनी प्रसादाची ताटे डोक्यावर घेऊन मंदिरात आणली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आणलेल्या नैवेद्याच्या ताटांनी मंदिर परिसर भरून गेला होता. या विधीनंतर भाविकांनी आंगणे कुटुंबीयांच्या घरी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यंदा मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि लांबवर जाणारे लेझर प्रकाशझोत भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. मंदिर परिसरातील भव्य सभामंडप आणि रोषणाईसोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी दिसून आली. भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आंगणेवाडी ग्रामस्थांनी नऊ रांगांचे चोख नियोजन केले होते. यामुळे लाखो भाविक असूनही दर्शन प्रक्रिया सुलभरित्या पार पडली. यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पोलिस प्रशासन, महसूल, आरोग्य, महावितरण विभाग, एसटी प्रशासन आणि आंगणे कुटुंबीय मुंबई व स्थानिक मंडळ यांनी मेहनत घेतली. यात्रेच्या निमित्ताने बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. आंगणेवाडीच्या प्रथेनुसार, पहिल्या दिवशी पाहुण्यांना आणि भाविकांना प्राधान्य दिल्यानंतर, दुसऱ्या दिवशी मुंबई, पुण्याहून आलेले आंगणे कुटुंबीय आणि स्थानिक ग्रामस्थांनी रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतले. कोणतीही अनुचित घटना न घडता यात्रोत्सव शांततेत पार पडल्याने ग्रामस्थांनी सर्व भाविकांचे आभार मानले. ‘माय माऊली, तुझी कृपा सदा आम्हावरी राहुदे’ अशा शब्दांत भाविकांनी देवीकडे साकडे घालून या वर्षाच्या यात्रेचा निरोप घेतला.



