जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आणि पंचायत समितीच्या सभापतीपदी शिंदे शिवसेनेचेच उमेदवार असतील-पालकमंत्री उदय सामंत


रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून काढले आहे. रत्नागिरी तालुक्यातील सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत शिवसेनेने विरोधकांचा अक्षरश ‘सुपडा साफ‘ केला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आणि पंचायत समितीच्या सभापतीपदी शिंदे शिवसेनेचेच उमेदवार असतील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून रत्नागिरी जिल्ह्यात फडकवलेला भगवा हे त्यांना आपल्याकडून वाढदिवसाची भेट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या विजयामुळे रत्नागिरी तालुक्यावर आमा शिवसेनो एकहाती वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून विरोधकांचे सर्व दावे फोल ठरवले असल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा गोळप जिल्हा परिषद गटाची झाली होती. शिवसेनेच्या नंदा मुरकर यांनी उदय बने यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करत इतिहास घडवला आहे. गेल्या २५-३० वर्षांपासून सत्तेत असलेल्या मातब्बर नेत्याला नंदा मुरकर यांनी धूळ चारली. एकाच व्यक्तीच्या अनेक वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावून शिवसेना काय असते, हे नंदा मुरकर यांनी दाखवून दिले आहे. हा विजय केवळ उमेदवाराचा नसून शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा विजय असल्याचे सामंत यांनी आवर्जून नमूद केले.

दुसरीकडे, हातखंबा आणि पाली गटातील चुरशीच्या लढतीकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. हातखंबा गटात सुयोग कांबळे यांनी विजय मिळवत शिवसेनेचा भगवा कायम राखला. पाली जिल्हा परिषद गट हे माझे घर आहे. परशुराम कदम यांनी चांगली लढत दिली, त्यांचे मी मनापासून कौतुक करतो. संघर्ष आज संपला, पण शेवटी जनतेने माझ्या शब्दावर आणि कामावर विश्वास ठेवला, असे सांगत सामंत यांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवल्याचे स्पष्ट केले. अनेक आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय चिखलफेक होऊनही मतदारांनी शिवसेनेच्या नेतृत्वालाच पसंती दिली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या घसरगुंडीवर सामंत यांनी प्रतिक्रिया देताना, ज्या जिल्हा परिषदेत यापूर्वी उबाठा गटाचे ३९ सदस्य होते, त्यांचे आज पूर्णपणे ‘पानिपत‘ झाले असून ही संख्या केवळ ३ ते ४ वर आली आहे, अशी टीका त्यांनी केली.

शेवटी, या दैदिप्यमान विजयाचे श्रेय त्यांनी शिवसैनिक आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. कार्यकर्त्यांमधील राजकीय संघर्ष आता संपवून विकासाच्या प्रक्रियेला वेग देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

विजयाचा गुलाल उधळल्यानंतर उदय सामंत यांनी या विजयाचे श्रेय सामान्य शिवसैनिक आणि मतदारांना दिले. मी दिलेला शब्द आणि जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास या निवडणुकीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे, असे ते म्हणाले. बंडखोरी, जातीय समीकरणे आणि स्थानिक अस्मितेचे मुद्दे उपस्थित करून सामंत यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता, परंतु मतदारांनी विकासकामांना प्राधान्य देत महायुतीची सरशी केली असल्याचे सामंत यांनी म्हटले. या ऐतिहासिक विजयामुळे रत्नागिरी तालुक्यात आता उदय सामंत यांचे एकहाती वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्याने आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचा उमेदवार बसणार असून, पंचायत समित्यांची नऊही सभापती पदे शिवसेनेकडेच असते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button