जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६

मतदान केंद्रांवर तातडीच्या उपचारासाठी वैद्यकीय पथक सज्ज

रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित व आरोग्यदृष्ट्या सक्षम वातावरणात पार पडावी, यासाठी आरोग्य विभागामार्फत सर्व आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर तातडीच्या उपचारासाठी वैद्यकीय पथके नियुक्त करण्याबाबत नियोजन व सूचना देण्यात आल्या.
त्या अनुषंगाने आरोग्य पथक आज (७ फेब्रुवारी) सज्ज ठेवण्यात आले असून मतदानाच्या दिवशी उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन आरोग्य परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक औषधे, प्राथमिक उपचार साहित्य, तसेच प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.
मतदार, निवडणूक कर्मचारी व सुरक्षा यंत्रणा यांना आवश्यक ते वैद्यकीय साहाय्य त्वरित मिळावे, उष्माघात, रक्तदाब, मधुमेह, चक्कर येणे इत्यादी तक्रारींवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रिया आरोग्यदृष्ट्या सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असून नागरिकांनीही मतदान करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button