
संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील नमन चालले परदेशवारीला
संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील निलेश किंजळकर या युवकाने सहा वर्षातच झांजगी नमनाला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले आहे. तालुक्यातील शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळाचे हे नमन आता परदेशवारीवर निघाले आहे. नमन १५ फेब्रुवारीला दुबई येथे सादर होणार आहे. नमनाला परदेशात नेण्याचा मान शिवभक्त मंडळाने मिळवला आहे. यामुळे रत्नागिरीतील समस्त नमन मंडळाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दुबईतील ग्लेन्डेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्रौ ९ या वेळात हे नमन सादर होणार आहे. यासाठी २० कलाकार परदेशवारीचा अनुभव घेणार आहेत.
कोकणचे खेळे अर्थात झांजगी नमन रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची, हास्यांचे कारंजे फुविण्याची ताकद या लोककलेत आहे. कोकणातील लोककलांपैकी एक अशा झांजगी नमनाला आता राजाश्रय मिळू लागला आहे. पारंपारिक लोककला, संस्कृती जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी नव्या पिढीने आपल्या खांद्यावर घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा नमन मंडळाचे उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने निलेश किंजळकर व सहकार्यांना या नमनाची निर्मिती केली आहे.www.konkantoday.com




