
कोकणातील विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘जीडीसी अँड ए’ परीक्षेसाठी आता रत्नागिरीतही केंद्र; २६ मे पासून परीक्षा
रत्नागिरी, दि. ८ ): सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘शासकीय सहकार व लेखा पदविका’ (G.D.C.& A.) आणि ‘सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र’ (C.H.M.) परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांसाठी आता पहिल्यांदाच रत्नागिरी येथे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे. कोकण विभागात यापूर्वी ठाणे हे एकमेव परीक्षा केंद्र होते. त्यामुळे कोकणातील इतर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ठाण्याला जावे लागत असे. मात्र, मे २०२६ च्या परीक्षेसाठी संगणक प्रणालीमध्ये ‘रत्नागिरी’ हे १७ वे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या तारखा आणि माहिती:
परीक्षा दिनांक: २६, २७ व २८ मे २०२६. अर्ज भरण्याची मुदत: ९ जानेवारी २०२६ ते २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत. संकेतस्थळ: इच्छुक उमेदवारांनी https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करावेत.
रत्नागिरी येथे केंद्र उपलब्ध झाल्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करताना केंद्राच्या रकान्यात ‘रत्नागिरी’ या केंद्राची नोंद घ्यावी, असे आवाहन केंद्रप्रमुख तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी (पत्ता: ८२१/अ, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पतपेढी इमारत, पहिला मजला, कॅनरा बँके जवळ, आरोग्य मंदिर, मजगांव रोड, रत्नागिरी) या कार्यालयाशी संपर्क साधावा.
तसेच, खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल:
साहेबराव पाटील (सहाय्यक निबंधक- प्रशासन): ८२७५४५८५४४, लक्ष्मीकांत केतकर (सहाय्यक सहकारी अधिकारी): ९०४९४९७४८९
कोकणातील परीक्षार्थींची सोय लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




